माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन
प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.
यवतमाळ : जाचक जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचा मोर्चा
यवतमाळमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संचमान्यतेसाठी तसेच कंत्राटी शिक्षक भरतीच्या शासन निर्णयाला रद्द करण्याच्या मागणीसह शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा आणि शिक्षणाबद्दल शासनाकडून सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. शिक्षण हक्क कायदा २००९ च्या तरतुदींचा उल्लंघन करणारा हा निर्णय असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे, असे शिक्षकांनी म्हटले आहे.
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
यवतमाळ : आर्णी येथे किरकोळ कारणावरून तरुणाला जीव गमवावा लागला
यवतमाळ जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबत नसून आता आर्णी शहरात क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मयत तरुण संभाजीनगर येथील गणेश मंडळात आयोजित महाप्रसादाला गेला होता, जेवण सुरू असताना एका तरुणाने वाद घातला, परिणामी त्याच्या डोक्यात जीवघेणा हल्ला झाला. जिथे तो गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे.
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
यवतमाळमध्ये गोकुळाष्टमीचा उत्साह, घराघरांत श्रीकृष्णाची मूर्ती स्थापना
यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने घराघरांत श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करण्यात आली. "जय कन्हैया लाल की" अशा गजरात आणि शंखनादात रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. अनेक कुटुंबांत शेकडो वर्षांची श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे, आणि या दिवशी सुंदर देखावे विशेष आकर्षण ठरतात. मूर्ती स्थापनेनंतर रात्रभर भजनाचे कार्यक्रम होतात, आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि उद्या विसर्जनानंतर गोपाळ काल्याचे आयोजन होणार आहे.
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
राज ठाकरेंचे आव्हान: सत्ता द्या, राज्य कसे चालवायचे ते दाखवतो
यवतमाळच्या वणी येथील जाहीर सभेत राज ठाकरेंनी सत्तेचे आव्हान दिले. त्यांनी म्हटले की, राज्यात कायद्याचा वचक राहिला नाही आणि सरकारच्या दबावाखाली संपूर्ण यंत्रणा काम करत आहे. एकदा सत्ता मिळाल्यास राज्य कसे चालवायचे ते दाखवून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिसांना 48 तास देऊन गुन्हेगारी साफ करण्याचे आश्वासन दिले. राजकीय वातावरण गढूळ झाल्याचे सांगून, निवडणुकीत मतदान केलेले लोक विकले जात असल्याची टीका केली. विधानसभा निवडणूक हा राग व्यक्त करण्याचा योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
यवतमाळ संतप्त महिलांनी पेटविला अवैध दारूचा अड्डा, दारू विक्रेत्यालाही बदडले
यवतमाळच्या वणी तालुक्यातील मंदर गावात महिलांनी अवैध दारू विक्रीविरोधात आक्रमक पावित्रा घेत दारू विक्रीचा अड्डा असलेला ढाबा पेटवला. पोलिसांना वारंवार तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने गावातील सामाजिक स्वास्थ्य बिघडले होते. महिलांनी ढाब्यावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात गावठी दारू जप्त केली. ढाबा चालकाने महिलांशी अरेरावी केल्यामुळे जमावाने त्याला बेदम मारहाण केली आणि ढाबा पेटवला. तालुक्यात अन्य अवैध दारू विक्रीचे अड्डे असून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
यवतमाळ जि प कर्मचारी पतसंस्थेच्या आमसभेत गोंधळ
यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या राळेगाव येथील आमसभेत प्रचंड गोंधळ झाला. विरोधी पॅनलच्या सभासदांनी प्रश्नांचा भडिमार करत नारेबाजी केली, ज्यामुळे संचालकांना सभा गुंडाळावी लागली. दोन वर्षांपूर्वी सत्तारूढ झालेल्या परिवर्तन पॅनलच्या संचालक मंडळामुळे पतसंस्थेत दोन गटांमध्ये सातत्याने वाद होत आहेत. विरोधकांनी पतसंस्थेतील 47 कोटी रुपयांच्या बोगस ठेवी, अतिरिक्त व्याज, नियमबाह्य कर्ज, एनपीए वाढ, आणि कार्यालयीन खर्चांवर आरोप करत गोंधळ घातला.
यवतमाळ : बांग्लादेशी हिंदूंवर अत्याचाराच्या निषेधार्थ पुसद मध्ये सकल हिंदू समाजाचा बंद कडकडीत
बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचारांच्या निषेधार्थ यवतमाळच्या पुसद येथे सकल हिंदू समाजाने कडक बंद पाळला आहे. पुसदच्या वसंतराव नाईक चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशातील हिंदूंच्या घरांची लूट, संपत्तीची नासधूस आणि हत्या होत आहे. हिंदू महिलांवर अत्याचार आणि मंदीरे उध्वस्त केली जात आहेत. बांगलादेशातील 1 कोटी हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी हिंदू समाजाने केली आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषाच्या खात्यात जमा
यवतमाळमधील आर्णी येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये अचानक जमा झाले. जाफरने या योजनेसाठी कोणताही अर्ज केला नव्हता. आता या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी जाफरने केली आहे. महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ पुरुषाला मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय निकृष्ट गणवेशाचा धक्कादायक प्रकार!
राज्य सरकारने 'एक राज्य, एक गणवेश' योजनेची घोषणा केली असली तरी यवतमाळ जिल्ह्यात या योजनेला हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. १ जुलैपासून शाळा सुरू झाल्या तरी केवळ ४७ हजार ७०९ विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे गणवेश मिळाले आहेत, तर एक लाख २१ हजार ५४४ विद्यार्थी अद्याप गणवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुना किंवा निकृष्ट गणवेश घालून स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
पेसा पदभरतीसाठी यवतमाळच्या पात्र उमेदवारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
पेसा पदभरती कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी यवतमाळच्या आदिवासी क्षेत्रातील पात्र उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलकांनी आरोप केला की, न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून पेसा क्षेत्रातील पदभरती थांबवली गेली आहे, त्यामुळे इतर सामाजिक प्रवर्गांना नियुक्त्या मिळत असताना पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवार वंचित राहिले आहेत.
यवतमाळ कावडयात्रेत ‘हर हर महादेव’ चा गजर, सेव्ह बांग्लादेशी हिंदूचे फलक
यवतमाळच्या श्री केदारेश्वर मंदिरात भव्य कावडयात्रा पोहोचली, ज्यात महिलांचा आणि बालकांचा लक्षणीय सहभाग होता. यात्रेत ‘सेव्ह बांग्लादेशी हिंदू’ आणि ‘शेख हसीनाच्या दडपशाहीला विरोध’ असे फलक झळकले. शिवभक्तांनी उत्तरवाहिनी नदीतील गंगाजल घेऊन श्री केदारेश्वर मंदिरात शिवलिंगावर जलाभिषेक केला. मुख्य बाजारपेठ मार्गे भव्य शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
यवतमाळ : रुग्णालय प्रशासनाने बंदी घातल्याने रुग्णसेवकांचा आंदोलनाचा ईशारा
यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील असुविधांमुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ होत असल्याचा आरोप करत रुग्णसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. निवासी डॉक्टरांच्या संपानंतर रुग्णसेवकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. रुग्णालयात डॉक्टर्स अनुपस्थित असतात आणि सुविधांचा अभाव आहे, ज्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णसेवकांनी स्वातंत्र्यदिनी संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.